मुहूर्त....


.
.
.
कसा आज अभिमान, माझाच मजला
नशीबात आले तुला पाहणे
किती सुख डोळ्यातही साठले की
विसरलेत आसू कसे वाहणे
.
.
कशा या मुहुर्तास, ही जोड़ आहे
पुन्हा अक्षदा आज टाकायची
किती जन्म गेले, किती भोग बाकी
मला ना गणिते ही मोजायची
.
.
ह्रुदयामधे हे समाधान ओले
मला सुख श्वासातही भासते
जसा सांगतो अर्थ कोणी मनाचा
जशी तू मला पाहूनी हासते
.
.
तुझ्या अंगणाची पुन्हा बाग़ झाली
फूले तीच गंधायची वेगळी
माझ्या मनाची, तुझी प्रीत वेडी
मला तूच वाटायची वेगळी
.
.
जरी वेगळी भासते तू जराशी
तुला ना चुके ते मला पाहणे
किती सुख ओटीत आले तुझ्याही
अता आनंदाश्रु कसे थांबणे..?
.
.
.
.
.
अम्बरीश देशपांडे
२६/१२/२००८ 

उत्तरे.....!!

उत्तरे ...!!
उत्तरे ही उत्तरे नसतातच !
ते असतात फ़क्त नविन प्रश्न उभा करायची जागा....
खोदून खोदून शेवटी एकच
भयान प्रश्न उरतो.. सृष्टि निर्मितीचा !
तोही शोधण्याचा. ..माझा अथक प्रयत्न
उगाच देवांच्या सुख-चैनिला त्रागा..
किम्बहुना उत्तरे ही उत्तरे नसतातच !
ते असतात फ़क्त नविन प्रश्न उभा करायची जागा....

मुळात उत्तरे असतात प्रश्नच !
असे प्रश्न.. ज्यावर मेंदू विचार करणार नाही
ज्यसमोर कुणी उलटप्रश्न विचारणार नाही
आवाजाची पातळी उंच तर "प्रश्न" आणि
उतरती तर "उत्तर"....हीच खरी व्याख्या
किम्बहुना उत्तरांची व्याख्या नसतेच कधी
ती असते नविन व्याख्या मागण्याची जागा...!!!

"समाधानकारक असतात उत्तरे"
यावर विश्वासच नाही माझा
उत्तरे असतात, नविन काहीतरी शोधतांना
विचारांनी उघडलेला दरवाजा...
आतून ओरडल असत कुणीतरी...
तप भंग करत: "यूरेका यूरेका!!"
किम्बहुना "नविन शोध" उत्तरे नसतातच..
ते असतात, CD बनवायला निघालेला ग्रामाफोनचा भोंगा !!

आयुष्यभर उत्तरांचा शोध घेउन
मिळतो फ़क्त अनंत प्रश्नांचा कोलाहल
समाधानी उत्तरांच्या शोधत, असमाधानाचे हलाहल
तरीही धावत राहतो मी... स्वत:.. वेड़ा..!
शोधत राहतो नविन उत्तर आणि
जन्म देत राहतो, नविन प्रश्नांना....
किम्बहुना प्रश्नांना उत्तरे नसतातच..
त्यांना असतात पिढ्या.. अगदी तुमच्या-आमच्या सारख्या!!!

उत्तरे ही उत्तरे नसतातच !
ते असतात फ़क्त नविन प्रश्न उभा करायची जागा....

अंबरीष
२७/१०/२००८

रावण ...!!!

नितितज्ञं, बुद्धिमान, दशग्रंथी, ब्राम्हण
पराक्रमी, शिवभक्त, महाबली रावण
इन्द्रजीत, माहायोद्धा, मायावी दशानन
ब्रम्हस्तप, ब्रम्हयोगी, ब्रम्हस्थित रावण

तप ज्याने ब्रम्हाचा, अविरत जप केला
ब्रम्हमुखे विष्णुला, जणू शापच दिधला
मृत्यु ज्यास नतमस्तक, ऐसा महादानव ..... महाभक्त रावण

सुवर्णमयी लंका, विश्वकर्मे घडविली
स्वर्गाहुनी सुंदर ती, ललना नटलेली
ऐश्वर्य इतुके! ठेवी कुबेराचे तारण ....... प्रतिपालक रावण !!

स्वयंवरी दिसे "राम", आठवला मोक्ष
स्मरले ब्रम्हवरदान, ब्रम्हवाक्य साक्ष
ब्रम्हज्ञानी, ज्ञात त्याला मृत्यूचे कारण... महाज्ञानी रावण

होइल रिपु माझा तो, तोडिल मर्यादा
पाहुनी संधी वनात, अपहरली सीता
उगा ठरले कारण ते, शूर्पणखा-लक्ष्मण ..... मायावी रावण

सितेस स्पर्श वर्ज, भोग त्यास नाही
ज्ञात त्यास शपथ तिची, शयनवास नाही,
"पतीसंगे वनवास", म्हणुनी अशोक-वन ..... प्रजापति रावण

इन्द्रजीत, मेघनाद, मोक्षप्राप्त झाले
कुम्भकर्ण, अहि-माहि, वैकुंठलोकी गेले
उद्धरले कुळ त्याने, सकर्तव्य पालन ..... महायोगी रावण

मृत्यु माझा, राज्य मात्र, दानवास राहे
कपटाने बिभीषणही, रामगटी आहे
जिंके राम, राज्ञ मात्र, मज बंधू बिभीषण.... दूरदृष्टि रावण

वाल्मिकिस ना दिसला, इतका तो ज्ञानी
"डाकूपणचे" प्रायश्चित्त, अधूरी कहाणी
"रामा" कथा दिव्य, मात्र अधूरे रामायण.... गा तुही स्तुती रावण

-अंबरीष
२२/१०/२००८

रोजच्याप्रमाणे.....!!!

आज पुन्हा नेम केला जिवनाचा
रोजच्याप्रमाणे.....!!!

पुन्हा लिहली डायरी,
त्यात लिहली नविन स्वप्ने
रोजच्याप्रमाणे.....!!!

आज पुन्हा बदलले ते पान,
ज्यावर कालचा नेम लिहला होता..
ठेवले तिथे 'सन्मानानी'
जिथे परवाचा नेम ठेवला होता..
आज पुन्हा लिहला !! श्रीराम !!
रोजच्याप्रमाणे.....!!!

आज ठरवल करायच काम
मिळवायची शाबासकी सर्वांची...
आज ठरवल लिहायची एक कविता मनापासून
जी होइल आवडती सर्वांची..
आज पुन्हा हातात घेतला पेन चेवाने
रोजच्याप्रमाणे.....!!!

आज लिहाल्या चार ओळी..
अगदी अंतर्मनापसून..
आज पुन्हा.. वाटल छपाव एक पुस्तक
अगदी पहिल्या कवितेपासून
मग वाचल्या "वाह !" म्हणत..
स्वत:च्याच कविता...
रोजच्याप्रमाणे.....!!!

आज थोड़ा उशीर झाला
तरी कविता मी पूर्ण केली
चालीत बिघडली थोडीशी..
पण आज अर्थपूर्ण केली
झोपायच्या आधी तीनदा वाचली
तीच कविता ...
रोजच्याप्रमाणे.....!!!

सकाळी उठालो आणि वाटल..
काय जिंदगी झाली आहे?
काहीच कस नविन नाही..
"बदलण्याची वेळ आली आहे"
मग ठरवून गेलो ऑफिसला..
की आल्यावर डायरी लिहणार..
आणि मी लिहला पुन्हा आजचा नेम...
रोजच्याप्रमाणे.....!!!

अम्बरीश
०८/१०/२००८

दूर दूर जगतांना...

मी US ला असतांना केलेली कविता.. US ला रहाणे सुद्धा एक गरज असते, त्यासाठी तिथली competition असतेच..सारखी अशी भीती वाटते की "मला आज परत पाठवतिल...." पण कुठेतरी या सर्वांचा वीट पण आला असतो..ती माझी मनस्थिती.....



आज वाटते भीती कशाला
मज माझ्या अस्तित्वाची
आज घडते घटना घेते
परीक्षा मज सत्वाची
का कुणाचा हेवा असतो
का असतो मत्सर कुणाचा
कुणी जाता समोर, का
भीती मागे रहाण्याची...!!

नविन रात्र हळूच पुन्हा
काळजित उद्याच्या येते
का जड़ होते भाषा जेव्हा
तारीफ़ कुणाची होते
मित्र म्हणुन जपावे जे,
पुच्छरहित प्राणी होते
का कुणाची चढ़ती बाजु
नमति आपुली होते....

पैसा कसा खेळ रचवतो
नाचवतो ताल स्वत:चा
देश, धर्म अन् सोडुनी
भाषातोडून बंध हृदयाचा...
इथे दूर यावे, अन् शिकावे
इथे श्वास घेणे, टिकवणे
मी जगत आहे, मी जगत आहे,
स्वत:स रोज समजवणे..

तुटलेच बंध, उरलेच फ़क्त
कलह स्म्रुतिंच्या ठेवी
नात्यात नाही, कुणी हात नाही
मन दगड, भावना अभावी
सरले ते स्वप्न, देशी निघावे
आज दूर दूर फिरतांना
उरलो विदेशी, मी एकटाच
इथे दूर दूर जगतांना...

दूर दूर जगतांना...

अम्बरीश
१२/०६/२००८

ती एक पहाट.....

सूर्याच्या किरणान्सोबत प्रत्येक पापणी लढत असते
नविन स्वप्न कुशीत घेउन, प्रकाशमूर्ती मढत असते
मन जेव्हा जाग होत, नव्या जगाच्या वाटेवर
सोबत घेउन ती वाट ..... ती एक पहाट.....

सावालीसुद्धा पडत नाही, तरी प्रकाश कुठला?
एकही पक्षी उडत नाही, तरी आवाज कुठला?
कुठेच काही दिसत नाही, तरीही सुंदर थाट आहे
सोबत घेउन तो थाट..... ती एक पहाट.....

सूर्याची किरणे कोमल, दवबिन्दु वेचायला
लाजुन उठते धरती, हिरवा शालू नेसयाला
सगळ्यात आहे नाजुकता, तरीही सगळ विराट आहे
फुलवून सौन्दर्य विराट... ती एक पहाट.....

अम्बरीश
०७/०६/२००५

थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता....

ही माझी दूसरी कविता..२००४ मधे लिहलेली. जास्त कही शब्दात मांडता आल नाही...
एकतेपणची भावना, guilty feeling हे सगळ दाखवायच होत...
पण आता तिला बदलत नाही..
माझा हा नेम बर्याच लोकांना आवडत नाही..
पण मी लिहलेला शब्द कधीच खोडत नाही..
त्यामुळे क्षमस्व


अथांग पाण्यामधे मी एक चेहरा पहिला होता
थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता

हातात हात ठेवणारे,
ठेवून हात मागणारे,
सर्व लगेच भिरकावणारे,
वारे जसे उडून जावे............
दिवसामधले क्षण सारे,
कामांमधले मन सारे,
मनामधले चंचल वारे,
सर्व सोबत घेउन जावे.........

मग समुद्राच्या लाटेसमोर, तो नम्रपणे वाकला होता
थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता....

निखार्याने जळलेला,
मनासाहित मळलेला,
उन्हामधे पोळलेला,
शिक्षा भोगतो जगण्याची.......
जमिनिसरखा तड़कलेला,
पाण्यासाठी तडफडलेला,
आगीमध्ये भड़कलेला,
वाट पाहतो मरणाची.......
मग मात्र खिन्न होवून, श्वास त्याचा थांबला होता..
थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता....

अम्बरीश
१२/०१/२००४

हातात असत माझ्या तर.....

हातात असत माझ्या तर,पाउस तुला दिला असता
चन्द्र तार्यांपेक्षा सई पाउस तुला भावला असता
दूर कुठे लुकलुकण्या पेक्षा चिम्ब भिजवतील पाउस धारा
तुझ्या संगे माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा भिजला असता....

हातात असत माझ्या तर, वार्याची झुळुक बांधली असती
माझ्या स्पर्शाप्रमाणे सई ती, अंगभर शहारली असती
अंगभर देऊन गारवा मोहरून टाकेल धुंद वारा..
वार्यासंगे मोहरनारीआपली प्रीत बहरली असती..

हातात असत माझ्या तर,नदी तुझ्या नवी केली असती
तुझ्यासाथिच्या सुर्यस्ताची कधीच वेल चुकली नसती
धगधगत्या सुर्याला शोषून स्वत:त बुडवून संथ वहाणे
नदीत सूर्य अन तुझ्यात मी माझीही प्रखरता शमली असती..

हातात असत माझ्या तर रोखला असता सूर्य मी
माहीत असता ग्रीष्म मला तर,सोडलाच नसता अर्ग्य मी
सये तुझ्या गालान्वरती नेहमीच असती पहाट किरणे
मध्यानिला केले असते वट वृक्षाचे कार्य मी..

सये आभार त्यांचे ज्यांनी माझ्यासाठी तुला घडवले
सये आभार नक्षत्रांचे ज्यांनी, त्यांतून एक मला पाठवले
सये माझ काही नाही, पणतय सर्वांचे प्रेम तुझ्यावर
मी तर फ़क्त दुवा त्यांचा तेच देतो, जे मज, त्यांनी दिधले..

अम्बरीश

नवरी .... (एक विदारक सत्य)

या कवितेच नाव ऐकल्यावर बरेच लोक विचार करतात की ही एक "नवरी" च वर्णन करणारी.. तिच सौन्दर्य वर्णन करणारी कविता आहे.. पण कविता ऐकून झाल्यावर मी बर्याच मुलींच्या डोळ्यात पाणी पहिल आहे.."मनाविरुद्ध लग्न" हे त्या मुलींनी भोगल असेल कदाचित...तुम्हीही नक्की वाचा


आणि जातांना ती वेगळीच हसली
डोळ्यांमधे पाणी होते .......
थरथरणार्या ओठांवर, माझेच नाव होते
मला माहित आहे, तो लाल रंग...
ते दागिने तिचा जीव घेत होते...

स्पर्श !.... स्पर्श आठवत असतील तिला
प्रेमाचे, करूणेचे ...... माझे
आणि आता .... संत्वानाचे
विस्कटलेल्या आठवणी एकवटून,
डोळ्यात सामावून जात होते
सरे बंध, सरे नियम तोडून तिचे डोळे,
मझ्यासाठी वहात होते..
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते

ज्या खांद्यावर ती, डोक ठेवायची
विश्वासानी, प्रेमानी ... लाडानी
पण आता.... भरल्या डोळ्यानी
आभाळाच्या सवालीपेक्षा आधाराच्या खांद्यावर
आज आभाळ कोसळत होते,
सर्वांना माहित आहे तीच नाव ...आज तिला सारे, "नवरी" म्हणत होते
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते...

तिच्या छातिचे ठोके
भरलेले डोळे, उसासे.... हुंदके
साठवत होतो मी..
एकटाच रडत होतो मी
माझे नाव तिच्या मनाच्या प्रत्य्रेक कोपर्यात होते
आणि तिलाही माहित आहे, तिला
मला शेवटचे पहायचे होते..
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते...

आणि ती निघून गेली मला एकदाही न पाहता
जणू अनोळखी होतो आम्ही
अन अनोळखीच राहू आता
डोळ्यांशिवायही तिच मन
मला वळुन पाहत होते
का म्हणुन ते रडणे तिचे
माझे मन जाळत होते .......
मला माहित आहे, तो लाल रंग...ते दागिने तिचा जीव घेत होते...

अम्बरीश
१०/०९/२००७

शक्ति दे, शक्ति दे......

कड कड कड कर निनाद, गड गड कर मेघनाद
चित्कार तुझा, वार तुझा, धरणी दुभंग आज
शक्ती रूप होवून ये, जाळ पाप, कर विनाश
हवुनी प्रसन्न मज तू, शक्ति दे, शक्ति दे......

चिरत जा भस्मांची, प्रेतांची वाट तू

निवडुंग दाट उभे, मार्गातून काट तू
वेग घे, उद्वेग घे, दणदणु दे सर्व आज
दाह-देह आग-प्राण, शक्ति दे, शक्ति दे......

दाही दिशा उजळू दे, लाल रंग पसरू दे

आत्म्याचा क्रोध तुझा, तांडवात उतरु दे
'त्राहि माम" चित्कार, रक्त रक्त उधळू दे
पुनश्च दानव विनाश, शक्ति दे, शक्ति दे......

जळून उठे आज इथे, रक्त तुझे, भक्त तुझे
आगेतुन कर मन तू, व्यक्त तुझे, सक्त तुझे
पसरू दे तनमनात, दाह तुझे, देह तुझे
अनुभवू दे शक्ती आज, शक्ति दे, शक्ति दे......

शक्ति दे, शक्ति दे......
शक्ति दे, शक्ति दे......
शक्ति दे, शक्ति दे......

--- अम्बरीश
२३/०९/२००८

सल मनातली !!!

आता मनातली या, सल काढता येइना..
मज देव भेटला तरीही, वर मागता येइना
दिवस कठीण वैरी, येती भरून डोळे
माझ्या मनीचे मजला, तुज संगता येइना....

म्हणुनी उगाच शाई, उमटावी अलगद वरुनि
परी चित्र मनातले या, रेखाटता येइना..

कुणी प्रेम भंग म्हणतो, कुणी वेड एकेकाचे
जगास दू:ख माझे, उद्-गारता येइना..

जग वेगळे म्हणोनी, मज वेगळेही केले
मन वेगळे तरीही, झिडकारता येइना...

कार्ये दिनी अनंत, सांगुन सर्व गेले
पण कार्य आसवांचे, मज टाळता येइना..

मी थांब वदलो तेव्हा, थांबून श्वास गेले
पण देही असे वासना, ती थांबवता येइना...

आता मनातली या, सल काढता येइना..

अम्बरीश
१२/०६/२००८

माझ्या आर्त गाण्याला ....

जड़ जाहला देह ऐसा, देवही आता पोसत नाही
माझ्या आर्त गाण्याला या, सुरांचा भारही सोसत नाही...

भोगले जे सर्व काही, पापही अन पुण्य सारे
लावुनी गणिते जगाची, स्वर्गास मी पोहचत नाही

बंद नेत्रांची कथा मी, सांगतो एकांत देशी
उघडता नेत्री कुणाची, सावलीही दिसत नाही

घर म्हणावे की दुरावा, रहते ही फ़क्त आत्मा
देह का जपत राहतो, माझे मलाही कळत नाही

श्वास घेतो तर जीवंत, नेत्री दृश्याचिच खंत
काळ टळतो म्हणुन जगणे, असे आता जगवत नाही

आहे ना उरला कुणी, प्रतिमेचा झालो ऋणी
का विचारू मी जगाला, मज आरसा ओळखत नाही

अम्बरीश
२०/०५/२००६

त्या मार्गावरून...!!!

एक नाटकात, आम्हाला एक कवितेसारखा dialog हवा होता. तो इथे लिहला आहे..
कव्यान्जलिचे रसिक वाचक सहज context समजुन घेतील, याची खत्री आहे...

वाटत, त्या मार्गावरून, पुन्हा एकदा जावे
त्या अस्पष्ट संघर्षाला, पुन्हा समोरे जावे

पण मला अड़वतात त्या आठवणी......
ज्यांच्यासोबत मी राहिलो
ज्यांच्यासोबत मी लढलो
अन ज्यांच्यासोबत मी हरलो

पुन्हा तिकडे वळण्यासाठी, नाही म्हणतात सगळे
जाणत नाही कुणी, काही हिशोब राहिले मोकळे

पण पुन्हा मी एकदातरी.......
मी जाइल तिथे हरायला
मी जाइल तिथे लढायला
मी जाइल पुढे सरायला

आणि एक डाव असा जिंकुन येइल मी
मग सर्व जगाला दाखवेल कमी....

कारण मी जिंकुन घेतलेला ...
तो डाव असेल माझा
तो डाव असेल शेवटचा
तो डाव असेल मृत्यूची

हजार अभिमन्यु युद्धात या, जरी पडतील धारातीर्थी
चक्रव्यूह हेच तोडून जाइल, नर एक अन सोबत सार्थी

नर एक अन सोबत सार्थी ......

अम्बरीश
०६/०३/२००४

बस एकच जगणे लिहायचे !!!!!!

मी पुन्हा मोजायची का, तीच किम्मत जगण्याची
का इथे नाहीच जगणे, फ़क्त वाट ही मरणाची
का मीच सांगू जगाला, आज भाषा या मनाची
तेच जगणे, तेच मरणे, हीच वाट जीवनाची

"नाही" म्हणणे कुणास कळले, फ़क्त भोगिले दू:ख सारे
तरीही रडते मग झगड़ते, का वाहती विरुद्ध वारे
परी मोजुन श्वास ठोके, दिवस पुढे ढकलायचे का?
रोज मारुनी उठायचे अन्, रोज उठुनी मरायचे का?

भोगले ते शाप होते, आणि भोगही पाप होते
दूर कोसंवर नभातिल, तारकांचे कोप होते
नशीब म्हणता हेच सारे, रटाळ तरीही जगायचे का?
याच धरतीवर पुन्हा मी, मतिसवे उडायचे का?

डोंगराची कुठे ऊँची, सावली मज सोसवेना
पाहू मी वरती कुणा, कुणी भावना ही पोचवेना
दिव्या कुणी असते म्हणे ते, शहाणे सारे सांगताती
रक्तात हात, डोळ्यात आसू, तरीही स्तुति खरडून गाती

कुणीही नाही सोबत आता, फ़क्त जखमा सर्व अंगी
चौमुखी आहे म्हणे तो, कुणी म्हणे तो भास्मांगी
जर दिसे त्याला जगाची, सर्व दू:खे सर्व लोकी
मीच का उरतो असा की, टाकिला इतरात बाकी

वर बघुनी मिटती डोळे, जग हे सारे वेंधळे रे
आस ठेउनी उन्चावारी, वर मृगजळी सपळे रे
लिहले पाहिले ललाटी तर, का हे मरणे जगायचे
लिहणार्यानेच द्यावे वचन, बस एकच जगणे लिहायचे

बस एकच जगणे लिहायचे !!!!!!


अम्बरीश
१२/०८/२००६

दरवळ....

या कवितेला "The CreativeBytes" तर्फे झालेल्या काव्य स्पर्धेत पारितोषिक मिळाले होते..
तसेच राहुल देशपांडे, यांनी या कवितेचे कौतुक केले होते..

मातीचा गंध
उठे सुगंध
होई निर्बंध
कसा हा दरवळला...

सुगंधी श्वास
हाती आकाश
असा विश्वास
मनामधे सळसळला

गर्द ते मेघ
काजळी रेघ
आज उद्वेग
त्वचेवर सरसरला

नभ तो नीळा
ढगांचा टीळा
घेउनी खुळा
बघ कसा गडगडला

अश्रुमय अक्ष
टाकी कटाक्ष
बघतेस लक्ष
लक्ष पाउस धारा

मनाचे बांध
करी निर्बंध
असा तो शित
संथ वाहे वारा

दिसतसे क्षितिज
त्यागतो आज
त्यामधे अब्ज
अब्ज मी किरणाहुती

केशरी रंग
त्यामधे दंग
गावुनी अभंग
गंधली ही माती

अम्बरीश
१०/१०/२००५

पाऊसधारा...

आतून अडून सूर्यही बघतो,
उधाण समुद्र किनारा...
ठेउन आज मल्हार बाजूला
मी गातो पाऊसधारा...
खडकावरुनी लाट सरावी
तसा अंगावरुनी वारा..
तन मनात उठुनी शहारा
मी गातो पाऊसधारा...

धूसर नभाची नाती गोती
सभा मंडपी येती.....
जणू जडावे रूणानुबंध
आलिंगने ती देती....
झाकुनी मग मी सूर्यलाही
फुलवून मोर पिसारा
मी गातो पाऊसधारा...

दरवळ उठतो धरती वरती
चाहुल पाहुणा देतो....
रिमझिम बरसून झाडान्वरती
कड़े कपारीत वळतो....
खळखळणार्या पाण्यासन्गे
मोहरता तुझा इशारा...
मी गातो पाऊसधारा...

विरळ नभातुन सूर्य अचानक
प्रभात किरणे देतो ....
जणू अंगावर हात तुझा
कुरवाळुन मी घेतो ..
वाहे गारठा हिरव्यारानी
पण, उबदार तुझा निवारा
मी गातो पाऊसधारा...

पाऊस रिमझिम सूर्यासंगे
नविनच नाते विणतो...
मायेच्या उबेत अचानक
सडा प्रेमाचा पडतो...
ईंद्रधनु जेव्हा अवनिला
करतो लऊन मुजरा...
मी गातो पाऊसधारा...

अम्बरीश
१२/०९/२००८

हे नाते शब्दांचे !!!!!

हे नाते शब्दांचे !!!!!

नमस्कार ! मी अम्बरीश देशपांडे,

मी माझ्या कविता या Site वर Post करत राहील. आणि तुम्हाला त्या वाचायाच्या आहेत.
हा माझा आग्रह समजा किंवा request.

थोड स्वत: बद्दल आता लिहायला हरकत नही:

तबला:
१. १९९७ ला, अमरावतीला स्टेट बैंक कॉलनी मध्ये, मी माझ्या तबल्याच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर, शाळा, गुजराथी समाज व इतर ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम केले..२००३ च्या कॉलेज संमेलनात मी माझे तबल्याच्या सथिचे १०० कार्यक्रम पूर्ण केले..
२. तबल्यामधे, अजराडा आणि फरुखाबाद घरांना यांचा अभ्यास करून.. मी ५ यशस्वी सोलो कार्यक्रम केले.. पण मुळ गाण्यात आवड असल्याने साथसंगत हेच निवडले आणि अजुनही करतोच !!
३. विद्यापीठ, विदर्भ आणि महाराष्ट्र पातळीवर विविध कार्यक्रमात साथसंगत केली.. यामधे यूथ फेस्टिवल, विदर्भ संगीत अधिवेशन याचा समावेश आहे...
४. सध्या 'The Creative Bytes' आणि 'Royals' साठी तबला वाजवतो... मुख्यत: मी स्वत:साठी तबला वाजवतो... आतापर्येंत १३५ वेळा, मायबाप प्रेक्षकांनी माझा तबला ऐकला आहे...

आणि हो, सर्वात महत्वाच सांगायच राहून गेल..Florida, USA ला तबला या विषयावर Seminar दिला असून, तिथे "Tabla-Forum" ची स्थापना सुद्धा केलि आहे... अजुनही Tampa येथे, तबला classes होतात !!माझ्या १२९ programs पैकी, २ programs, Florida चे आहेत...

नाटक:

१. १९९६ ला, "हाउसफुल" या स्वलिखित नाटकापासून माझ्या नाट्य क्षेत्राची सुरवात झाली.. "हाउसफुल" चे २८ विवध ठिकाणी प्रयोग झाले..
२. "वह्राड निघाले लंडनला" चा माझा बहुपात्री स्वदिग्दरशित प्रयागाने प्रथम क्रमांक पटकावला..त्यानंतर.. "स्वप्नसुंदरी" या स्वलिखित स्वदिग्दरशित नाटकाने सुद्धा Govt. polytechnic आणि medical colleges मध्ये प्रथम क्रमांक मिळवला...
३. "निसर्ग संवरक्षण संस्था" तर्फे आयोजित "प्रदुषण" या नाटकाचे 30 यशस्वी प्रयोग आम्ही अमरावती विभागात केले..
४. पण हळूहळू ही कला दूरावत गेली आणि कॉलेजमधे २००५ ला मी माझा शेवटची भूमिका केली.. अजुन ही गाथा तिथेच थांबली आहे....

निवेदन:
१. २ अक्टूबर १९९८ ला प्रथम निवेदानाला सुरवात केली.. त्यानंतर, शालेच्या प्रत्येक कार्यक्रमाचे निवेदन माझ्याकडे आले..
२. BNVC Amravati या संस्थेचे ६ कार्यक्रम मी निवेदित केले..
३. कॉलेज मध्ये सम्मलेन, विशेषत: गाण्याचा कार्यक्रमाचे निवेदन केले...
४. सय-२००४ हा मी निवेदित केलेला सर्वात मोठा अणि आवडता कार्यक्रम..!!!
५. आतापर्येंत मी १६ कार्यक्रमाचे निवेदन केले आहे....
६. अजूनही निवेदन मिळत आहेत आणि या क्षेत्रात खुप समोर जाण्याची ईच्छा आहे.

इवेंट मैनेजमेंट:
१. BNVC च्या कार्यक्रमंपसून माझ्या इवेंट मैनेजमेंट ची सुरवात झाली.. PINRES.. (Power Industry re-structuring)हा माझ्या इवेंटचा आवडता Program.
२. जास्त सांगत नाही, पण तरी...आगामी "संस्कृतीच्या पावुलखुणा" ही माझ्या कलेची परिक्षाच राहिल...!!!

Last and the best ................Poetry:
कविता:
१. माझ्या कवितांना पहिला स्टेज २००१ मधे "रिमझिम" मध्ये मिळाला. तेव्हा मी काही चारोळ्या सादर केल्या..
२. त्या नंतर विविध कार्यक्रमात आणि माझ्या निवेदनात मी माझ्या कवितांचा सम्पूर्ण वापर केला. BNVC मध्ये "प्रेमाचे श्लोक" च यशस्वी प्रयोग झाला..
३. नाशिक येथे पहिल्यांदाच काव्यांजलि कवि संमेलनात "पाउस धारा" सादर केलि..
४. २३ नोव्हेंबर २००८ ला, पत्रकार भवन, पुणे येथे "शब्दात माझ्या" सहभागी झालो आहे...

"नाते शब्दांचे" या पुस्तकाचे १५ मार्च २००९ ला प्रकाशन झाले असून, ते आता सम्पूर्ण महाराष्ट्रात available आहे.

आणखी १ मराठी आणि १ इंग्लिश पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.