चांदणे...

.
.
आज मोजून घे... तू जरा चांदणे
धुंद रात्रीतला... स्पर्श हा वेचणे
बघ नभातूनही भाळला चंद्रमा
लाज गालांवरी लाजरी रक्तिमा
सोड आता जरा... तू असे लाजणे
आज मोजून घे... तू जरा चांदणे
.
.
लाट वाहे उरी... मंदशी बासरी
स्वप्न सारी तुझी... या मना सावरी
गारवा.. मारवा.. मग कशाला हवा?
बस तुझा गोडवा.. अन नभी चांदवा...
ओढ नेत्रातली... बस तुला पाहणे
आज मोजून घे... तू जरा चांदणे
.
.
भावना या मना... गोडशी यातना
हुऱ्हुरीचा मला... अर्थ तू सांगना
कोवळी... सावळी.. सांज ही वेगळी
प्रेम झाली हवा.. तू गुलाबी कळी
कोवळासा गुन्हा.. मी पुन्हा मागणे
आज मोजून घे... तू जरा चांदणे


अंबरीष देशपांडे

No comments: