बहरू दे गाणे मनाचे !!!

बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले !!
.
.
.
भोगले जे जे इथे तू आज ते विसरून जा
आज घे जगणे असे की "नाव" तू ठेवून जा
मुक्त हो पण सक्त हो, गा गीत तू ह्रदयातले
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
संथ तू चालू नको, आता जरा बेभान हो
दूर होती वादळे आता स्वतः तुफान हो
शोधूनी हिरे पहा ना, तू तुझ्या खाणीतले
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
थांब तू, वळूनी पहा, जे घेतले, जे सोडले
काय गेले? काय आहे? काय कोठे राहिले?
नित्य आहे "पोट", आता कर जरा रक्तातले
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
बंद नेत्रांनी जरा तू स्वप्न कीर्तीचे पाहा
कर जरा कणखर मुठीं, कर सुख-चैनीना स्वाहा
हो स्वतः श्रीराम.... कोठे हात तू रे जोडले?
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
.
अंबरीष देशपांडे

No comments: