अधरावरती थरथरले.........

.
.
प्रेमात धुंद मन हे, का वेडे होई दीवाणे
अधरावरती थरथरले, अंतरातले उखाणे...!!
.
.
प्रेम असे नि प्रेम तसे, मी ऐकून होतो सारे
कुणी न सांगे अर्थ मला, मन तडफडते बिचारे
पण क्षणात कळली दुनिया, जाहले तुला पहाणे..
अधरावरती थरथरले..........
.
.
तुला पाहता, क्षणात चुकला, हृदयाचा या ताल
सोडून गेली बुद्धी, केला गात्रांनी हडताल
सोपवतो तुलाच आहे, मी मनास या समजवणे
अधरावरती थरथरले..........
.
.
प्रश्न कसे नि उत्तर कुठले, सर्वच हे अवघडले
"तुला पाहणे" हे प्रश्नांचे उत्तर मज सापडले
आता नसे मनाला, असले प्रश्नोंत्तर मिळणे
अधरावरती थरथरले, अंतरातले उखाणे...!!
.
.
.
अम्बरीश देशपांडे
२६/०२/२००९

मला न कळले

मला न कळले...........

.
.
मला न कळले, कसे हे जडले, नाते आपुल्या प्रेमाचे
सुरात जुळले, मनात भिनले, गाणे आपुल्या प्रेमाचे
कशी सांज ही फुलून आली, तुझ्या नि माझ्या साथीने
मीच अता रे, मला हरवले, केली जादू प्रीतिने ...........
.
.
कशी दिवाणी, सांज ही मनी, वेळही खुळी का होते
फुलून मी, अलवार गुलाबी, फुल पाकळी मी होते
सुगंध होवून तुला बिलगते, माझी काया धुंदीने
मीच अता रे, मला हरवले, केली जादू प्रीतिने ...........
.
.
श्रावणातल्या पाऊसधारा सरसर ओल्या चिम्ब सरी
क्षणी बिलगतो धुंद गारवा, थेम्ब थरथरे मनावरी
चिम्ब तनावर स्पर्श तुझा की आग तनावर सळसळणे
मीच अता रे, मला हरवले, केली जादू प्रीतिने ...........
.
.

- अंबरीश देशपांडे

ती माझी कविता होते

.
.
सरसरणा~या वा~यावरती
ती बांधून जाते श्वासखुणा
हळव्याश्या या हृदयामधले
का कधी न कळले प्रेम कुणा?
.......... ती भास देवूनी जाते
.......... स्मरणे ठेवुनी जाते
.......... ती माझी कविता होते
.
.
निशा रंगते, तीही चोरते
आकाशातील चन्द्रचुरा
तिला पाहता, नक्षत्रान्नी
चमचमणेही घोर गुन्हा
.......... ती चन्द्र नवासा होते
......... स्वप्नात ठेवुनी जाते
.......... ती माझी कविता होते
.
.
खळी उमटता, कळी उमलते
मोहन घेते सर्व दिशा
सळसळते , गात्रांमधुनी
नवी नवी, पण धुंद नशा
............... ती गंध मनाचा होते
.............. ती फुलाफुलातुन गाते
.............. ती माझी कविता होते
.
.

:- अंबरीष देशपांडे

ती अशी ती तशी

.
ती अशी ती तशी
अप्सरा उर्वशी
मोगा~याची कळी
गंध अलवारशी
.
.
ती मनाच्या सवे
ती गुलाबी थवे
सांज ती साजरी
रात्र ती लाजरी
जवळ ये ना ज़रा
आर्त माझी कुशी ...
मोगा~याची..........
.
.
तीच स्वप्नामधे
तीच आता इथे
तीच आहे जणू
पाहतो मी जिथे
.. भास सारे खुळे
सांज वेडीपिशी
मोगा~याची..........
.
.
प्रेम ते हेच का
प्रश्न दाटे मनी
हर्ष का सांडतो
रोमरोमातुनी
... तूच तू.. तुही तू
मेरे दीलमें बसी
मोगा~याची..........
.
.
जाहलो धुंद मी
का तुला पाहुनी
अल्पसा घोट हां
घेतला चाखुनी
हाय ऐसी नशा
रेड वाइन जशी...

मोगा~याची कळी
गंध अलवारशी
.
.
:- अम्बरीश देशपांडे

स्पर्श दे...........

.
.

दाटुनी आले मनी
तू आज हाती हात दे
स्पर्श दे ओलावता
वेड्या मनाला साथ दे
.
.
आज मी सारी जुनी
सुकली फ़ुले कुरवाळली
आज मी स्मरणे तुझी
हळव्या क्षणातून माळली
गंध सरल्या जिवनी
गंधाळ पारीजात दे
स्पर्श दे.............
.
.
कोवळासा तो गुन्हा
कवितेत आहे गुंफ़िला
आजही अधरास ओला
स्पर्श आहे ठेविला
आज ये परतून मजला
लाजरी ती रात दे
स्पर्श दे...........
.
.
:- अंबरीष देशपांडे

बहरू दे गाणे मनाचे !!!

बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले !!
.
.
.
भोगले जे जे इथे तू आज ते विसरून जा
आज घे जगणे असे की "नाव" तू ठेवून जा
मुक्त हो पण सक्त हो, गा गीत तू ह्रदयातले
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
संथ तू चालू नको, आता जरा बेभान हो
दूर होती वादळे आता स्वतः तुफान हो
शोधूनी हिरे पहा ना, तू तुझ्या खाणीतले
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
थांब तू, वळूनी पहा, जे घेतले, जे सोडले
काय गेले? काय आहे? काय कोठे राहिले?
नित्य आहे "पोट", आता कर जरा रक्तातले
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
बंद नेत्रांनी जरा तू स्वप्न कीर्तीचे पाहा
कर जरा कणखर मुठीं, कर सुख-चैनीना स्वाहा
हो स्वतः श्रीराम.... कोठे हात तू रे जोडले?
बहरू दे गाणे मनाचे - वेगळ्या मातीतले
.
.
.
अंबरीष देशपांडे

चांदणे...

.
.
आज मोजून घे... तू जरा चांदणे
धुंद रात्रीतला... स्पर्श हा वेचणे
बघ नभातूनही भाळला चंद्रमा
लाज गालांवरी लाजरी रक्तिमा
सोड आता जरा... तू असे लाजणे
आज मोजून घे... तू जरा चांदणे
.
.
लाट वाहे उरी... मंदशी बासरी
स्वप्न सारी तुझी... या मना सावरी
गारवा.. मारवा.. मग कशाला हवा?
बस तुझा गोडवा.. अन नभी चांदवा...
ओढ नेत्रातली... बस तुला पाहणे
आज मोजून घे... तू जरा चांदणे
.
.
भावना या मना... गोडशी यातना
हुऱ्हुरीचा मला... अर्थ तू सांगना
कोवळी... सावळी.. सांज ही वेगळी
प्रेम झाली हवा.. तू गुलाबी कळी
कोवळासा गुन्हा.. मी पुन्हा मागणे
आज मोजून घे... तू जरा चांदणे


अंबरीष देशपांडे

* सूर मल्हार *

.
.
घन गर्जत सूर मल्हार आज
नित अमृत बरसत धार आज
.
.
शुष्क पामरे, आस धरूनी
सुख साचले, मेघ पाहुनी
गंध उठुदे, मातीमधुनी
होवू S दे, सर - थैमान आज
नित अमृत बरसत धार आज
.
.
पानांवरूनी तेज वाहुदे
दुभंगातुनी तळे साचुदे
वीज भयानक, खड्ग होवुनी
तळपत गड-गड मेघ नाद
नित अमृत बरसत धार आज
.
.
अंबरीष देशपांडे